नागरिकांनी केली नक्षलवाद्यांना गावबंदी, पोलिस-लोकसहभागातून प्रगतीची नांदी

भामरागड तालुक्यातील सात गावांचा पुढाकार 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 7 गावांनी नक्षलवाद्यांना  गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 जून 2024 रोजी धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव धोडराज पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला.
नक्षलवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे सात गावातील लोकांनी गावबंदीचा निर्णय घेतला.
म्हणून झाला गावकऱ्यांमध्ये बदल
विशेष म्हणजे ज्या गावांनी हा निर्णय घेतला  ती सात ही गावे गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. परंतू मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलिस दलाने दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ.च्या माध्यमातून येथील गावक­ऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यात यश मिळविले. त्यातून गावक­यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच अलीकडील काळात या परिसरात ईरपनार येथे मोबाईल टॉवरची उभारणी करण्याकरिता आलेल्या कर्मचा­ऱ्यांच्या वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ करून साहित्यांचे नुकसान करण्या आले. पोलीस खब­री असल्याच्या संशयावरुन एका निरपराध गावकऱ्याची हत्या करण्यात आली. गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे नक्षलवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक­यांच्या लक्षात आले. त्यामुळे गावक­ऱ्यांनी हा नक्षल गावबंदीचा ठराव संमत केला.
गावबंदीमुळे काय फरक पडेल?
या निर्णयामुळे  गावामार्फत कोणत्याही नक्षल संघटनेला जेवन, राशन, पाणी देणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना नक्षल संघटनेत सहभागी होऊ देणार नाही, नक्षलवाद्यांच्या बैठकीला जाणार नाही, आणि त्यांच्या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही असे गावकऱ्यांनी ठरविले. यावेळी मिळदापल्ली येथील गावक­ऱ्यांनी नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने खड्डे करुन पुरुन ठेवलेल्या धारदार लोखंडी सळाखी काढून आणून पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या.
गावकऱ्यांमध्ये हा बदल घडविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते व धोडराज पो.स्टे.चे  प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाऱ्या सात गावातील नागरिकांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन करत गडचिरोली जिल्ह्रास नक्षलमुक्त करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.