– अन्यथा कोरची तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच देणार सामूहिक राजीनामे

झेंडेपारच्या जनसुनावणीवर संघटनेचा इशारा

गडचिरोली : कोरची तालुक्यातील झेंडेपारच्या लोहखाणींच्या पाच कंपन्यांना दिलेल्या लिजवरील पर्यावरणविषयक जनसुनावणीदरम्यान दडपशाही करण्यात आली. आतमध्ये जागा नसल्याचे सांगत आम्हाला प्रवेश नाकारला. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करून नव्याने न घेतल्यास तालुक्यातील सर्व सरपंच-उपसरपंच राजीनामे देतील, असा इशारा सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

खाण कंत्राटदारांनी सुनावणी आपल्या बाजूने करून घेण्याकरिता कोरची परिसरातील जवळपास सर्वच चारचाकी वाहने भाड्याने घेतली होती. या वाहनांनी प्रकल्पाबाहेरील लोकांना मोठ्या प्रमाणात एक दिवस अगोदरच जिल्हा मुख्यालयी जमा केले होते. खाण विरोधातील लोकांना वाहने मिळूच नये अशी व्यूहरचना आखण्यात आली होती, असाही आरोप त्यांनी केला.

मिळेल त्या वाहनाने गडचिरोलीत पोहोचून जनसुनावणीमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सरपंच संघटनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला पोलिसांनी सभागृहात जाऊ न दिल्याने त्यांची मोठी निराशा झाली. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांनी प्रेस क्लबच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्याबाहेरील गोंदिया व छत्तीसगड परिसरातील लोकांना कंत्राटदाराने गडचिरोलीत आणले होते, असाही आरोप यावेळी करण्यात आला.

पत्रकार परिषदेला नांदणीच्या सरपंच सरील मडावी, मसेलीचे सरपंच सुनील सयाम, उपसरपंच वीरेंद्र जांभुळकर, अस्वलहुळकीच्या सरपंच छाया बोगा, उपसरपंच प्रेमदास गोटा, नवरगावचे सरपंच कौशल्य काटेंगे, अलिटोलाचे सरपंच गणेश गावडे, बिहीटेकलाचे सरपंच किशोर नरोटे, टेमलीचे उपसरपंच धनिराम हिडामी, बेतकाठीचे सरपंच कुंतीताई हुकुंदी, कोहकाच्या उपसरपंच ममता सहारे, कोहका ग्रामसभा अध्यक्ष नकुल सहारे, अर्मुरकसाचे सरपंच संतानू डिकोंडी, बेटकाठीचे उपसरपंच हेमेंद्र कारव, नानपूरचे सरपंच कुंदन कुमरे, बेळगांवचे सरपंच चेतन किरसान, नांदळीचे सरपंच अविनाश होळी आदी उपस्थित होते.

खाण विरोधकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पर्यावरणीय जनसुनावणीत आपले मत मांडण्यासाठी जाणाऱ्या विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच अडवून ताब्यात घेतले आणि गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काही काळासाठी स्थानबद्ध केले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, जयश्री वेळदा, शामसुंदर उराडे, भाकपचे डॉ.महेश कोपूलवार, ॲड.जगदीश मेश्राम, देवराव चवळे, अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राज बन्सोड, अ.भा.किसान सभेचे अमोल मारकवार, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे ॲड.विवेक कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, ग्रामसभेचे ॲड.लालसू नोगोटी, सैनू गोटा, जेष्ठ साहित्यिक कुसूम आलाम यांच्यासह पारंपरिक इलाके आणि ग्रामसभांनी झेंडेपारच्या लोहखनिज उत्खननाच्या जनसुनावणीला लेखी आक्षेप घेत जोरदार विरोध केला होता. यातील अनेक जण प्रत्यक्ष जनसुनावणीसाठी आले होते. एकतर्फी जनसुनावणी पार पाडण्याच्या प्रयत्नाविरोधात पाठपुरावा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.