गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे होऊ घातलेल्या सुरजागड इस्पात प्रा.लि.या लोहप्रकल्पाच्या उभारणीसाठी आज पर्यावरणविषयक जनसुनावणीचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही सुनावणी होणार आहे.
गेल्यावर्षी या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले होते. स्थानिक नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळाला यासाठी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पुढाकार घेऊन आपली जमिनही दिली आहे.
वडलापेठ येथील सुरजागड इस्पातच्या प्रकल्पात बेनिफिशिएशन प्लांट, पेलेट प्लांट, स्पंज आयर्न प्लांट, तसेच इंडक्शन फर्नेस, रोलिंग मिल आणि 150 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट होणार आहेत. त्यामुळे वडलापेठ परिसरातील 5 किलोमीटर परिसरातील गावांमधील नागरिक या जनसुनावणीला उपस्थित राहणार आहेत. त्यात खामनचेरू, महागाव (ख.), राजपूर पॅच, बोरी, वांगेपल्ली, टेकडामोटला, येल्ला, शांतीग्राम, चुटगुर्टा आदी गावांचा समावेश आहे.
जनसुनावणीत कंपनीच्या वतीने प्रकल्पस्थळी उभारल्या जाणाऱ्या बाबींसह पर्यावरणाची हाणी होणार नाही यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली जाणार आहे. याशिवाय नागरिकांच्या काही शंका असतील तर त्याही दूर केल्या जाणार आहेत.