रानटी हत्तीच्या कळपाचा सुर्यडोंगरी, आकापूर, किटाळी शिवारात हैदोस

दुचाकीवरून आमदार पोहोचले शेतात

आरमोरी : रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, गडचिरोली तालुक्यानंतर पुन्हा एकदा आरमोरी तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. या हत्तींनी आता सुरडोंगरी, आकापूर, किटाळी शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान व मक्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाळ्यानंतर आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी दुचाकीवरून प्रवास करत शेतात पोहोचून नुकसानीची पाहणी केली.

हत्तींच्या कळपाने बोअरवेलची पाईपलाईन, कृषी पंपाच्या साहित्याचीही नासधूस केली. एवढेच नाही तर शेतातील झोपड्याही मोडल्या. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश शेतकरी बँकांकडून पिक कर्ज घेऊन शेती करणारे असल्यामुळे कर्ज कसे भरायचे, मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी कुठून मदत घ्यायची, या विवंचनेत पडले आहेत.

दरम्यान आमदार रामदास मसराम यांनी सुरडोगरी, आकापूर, किटाळी परीसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर मोटारसायकलने जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. तसेच मका पिक व साहित्यासाठी मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम नुकसानीपेक्षा नगण्य असल्यामुळे यात वाढ करण्यासाठी आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार, असेही आश्वासन दिले.

यावेळी आरमोरी वनपरिक्षेत्राधिकारी बडोले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, अनिल किरमे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज भोयर, माजी ग्रा.पं सदस्य रेवनाथ सयाम, ग्रा.पं.सदस्य पेन्दाम, नारायण बोरकुडे, वनपाल गेडाम, वनरक्षक भोयर, लालाजी मेश्राम, नारायण बोरकुडे, देवाजी हजारे, कालीदास मेश्राम, सुरेश मेश्राम, येमुबाई हजारे, राजकुमार हजारे, ज्ञानेश्वर बाबोळे, भुजंगराव मेश्राम, सुनील मेश्राम, देवीदास मेश्राम, यांच्यासह नुकसान झालेले व अन्य शेतकरी उपस्थित होते.