कुरखेडा : मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात शासकीय स्तरावरून मंजूर घरकुलांचे बांधकाम रेतीअभावी रखडल्याने घरकुल बांधकाम थांबल्या गेले होते. आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
चोरीच्या मार्गाने काढल्या जाणाऱ्या रेतीचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे शेकडो घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असतानासुद्धा रेती मिळत नसल्याने तालुक्यातील बऱ्यांच घरकुलांची कामे थांबल्या गेली होती. रेती उपलब्ध करून द्यावी याकरिता आ.कृष्णा गजबे यांच्याकडे अनेक घरकुल लाभार्थ्यांनी निवेदन सादर केले होते. त्या अनुषंगाने आ.गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच जिल्हाधिकारी दैने यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली.
दरम्यान कुरखेडा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना रेतीचा लाभ तात्काळ मिळावा याकरिता तहसीलदार कुंभरे यांच्यासोबत बैठक घेऊन आ.गजबे यांनी त्यांना निर्देश दिले. त्यानुसार रेती देण्याची प्रक्रिया सुरू करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला कुरखेडाचे गटविकास अधिकारी धीरज पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेष मेश्राम, प्रा.विनोद नागपूरकर उपस्थित होते.