चिचडोह प्रकल्पासाठी झालेल्या बोगस रजिस्ट्री रद्द करून शेतकऱ्यांना मोबदला द्या

शेतकऱ्यांचे आ.डॉ.देवराव होळी यांना निवेदन

चामोर्शी : चिचडोह प्रकल्पात बाधित जमीनधारक काही शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अजूनही झालेली नाही. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई देण्यासोबत काही दलालांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक करून बोगस रजिस्ट्री प्रक्रिया केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी बोगस रजिस्ट्री करून घेतली आहे अशा अधिकाऱ्यांवर व संबंधित दलालांवर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून गडचिरोलीचे आ.डॅा.देवराव होळी यांच्याकडे केली.

चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सिंचन सुरू होऊन शेतीला पाणीपुरवठा सुरू झालेला आहे, मात्र अजूनही त्यातील 60 ते 70 शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी व प्रक्रिया होईपर्यंत नुकसानग्रस्तांना नियमित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केली.

यावेळी शेतकरी प्रदीप साखरे, संतोष गव्हारे, देवाजी जुवारे, देवनाथ बोधलकर, सतीश भांडेकर, राजेश धोडरे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रतिक राठी प्रामुख्याने उपस्थित होते. आपण या प्रकरणी जातीने लक्ष देऊन दलाल व अधिकाऱ्यांना कठोर दंड आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.