गडचिरोली : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा महिला व बाल रुग्णालयात खा.अशोक नेते यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून करण्यात आला.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार नेते यांनी पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओ डोस दिला पाहिजे. बालकांचे जीवन सुदृढ आणि सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिओ डोस आवश्यक आहे. या लसीकरणातून बालकांच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री मिळते. बालकांना पोलिओमुळे येणारे अपंगत्व येऊ नये यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते, त्याचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
सदर मोहीम ग्रामीण क्षेत्रात ३ दिवसांकरिता व शहरी क्षेत्रात ५ दिवसांकरिता राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावळ साळवे यांनी दिली. यावेळी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, डॉ.प्रफुल्ल हुलके, डॉ.माधुरी किलनाके, डॉ.हेमके, डॉ.बागराज धुर्वे, डॉ.पेंदाम तसेच आरोग्य कर्मचारी वृंद व महिला भगिनी उपस्थित होते.