गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट

प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यात सलग आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसात थोडी उसंत घेतली आहे. मात्र बुधवार आणि गुरूवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. अशा स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात बंद असलेले सर्व मार्ग आता वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. मात्र पुढील दिवसात चांगला पाऊस झाल्यास आणखी हे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.