आलापल्लीवासियांच्या मालमत्तेची चौकशी होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश

अहेरी : दक्षिण गडचिरोली भागातील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्लीकरांच्या मालमत्तेची नव्याने मोजणी होऊन त्यांना प्रॅापर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) दिले जाणार आहे. कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन संबंधितांना निर्देश दिले. त्यामुळे आलापल्लीवासीयांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आलापल्ली येथील ग्रामवासियांकडे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य झाले नाही. धर्मरावबाबा आत्राम आमदार असतानाही त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. सातत्याने ही मागणी लावून धरली होती. आता मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खातेही त्यांना मिळाले. त्यामुळे खातेवाटप होताच त्यांनी आपल्या निर्वाचन क्षेत्रातील हे महत्वाचे काम मार्गी लावले आहे.

धर्मरावबाबा यांनी उपसंचालक भूमी अभिलेख, संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) पुणे यांच्याशी संपर्क साधून आलापल्लीवासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले. त्यांचे निर्देश मिळताच संबंधित कार्यालयाकडून सदर विषय मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. येथील नागरिकांचा मालमत्तेबाबत पुनर्चौकशीची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.