गडचिरोली : बांगला देशात हिंदू समाजबांधवांसह तेथील सर्व अल्पसंख्यांक समाजावर कट्टवाद्यांकडून हल्ले, हत्या आणि लुटपाट केली जात आहे. एवढेच नाही तर महिलांवर अमानवीय अत्याचार केले जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आणि बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्याक समाजाच्या समर्थनार्थ गडचिरोलीत मंगळवारी जनआक्रोश न्याय यात्रा काढली जाणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. बांगला देशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्याक समाजावर बांगला देशातील जिहादी प्रवृत्तींकडू हल्ले केले जात आहे. घरे, व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना घडत आहेत. मंदिरांमध्ये चोऱ्या आणि देवी-देवतांच्या विटंबनेच्या घटना होत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराविरूद्ध आवाज उठविणाऱ्यांचा आवाज बांग्लादेश सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हा अन्याय अत्याचार त्वरित थांबविण्यासह बांगलादेशातील इस्कॅान मंदिराचे स्वामी चिन्मय कृष्णदासजी यांची कारागृहातून सुटका करावी यासाठी गडचिरोलीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन पाठविले जाणार आहे. भारत सरकारने त्यासाठी बांगलादेशवर दबाव टाकावा अशी मागणी त्यात केली जाणार आहे.