एटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या कोंदावाही येथे सिनेट सदस्य तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आश्रम यांच्या हस्ते समाज मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. स्थानिक विकासासाठी आमदार निधीतून हे बांधकाम होण्यासाठी भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेतला.
येमली ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट गावे अतिदुर्गम म्हणून ओळखली जातात. त्यात कोंदावाही गावाचाही समावेश होतो. या गावात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी यापूर्वीच केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भाग्यश्री आत्राम यांनी तात्काळ निधी मंजूर करण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे मागणी केली. या गावात विविध विकास कामे केली जाणार आहेत.
विशेष म्हणजे स्वतःचा वाढदिवस असतानाही घरी न थांबता त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी अतिदुर्गम कोंदावाही गाठून समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन केले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा वाढदिवस असल्याने जल्लोषात स्वागत करून त्यांना सुखद धक्का दिला.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, येमलीचे सरपंच ललिता मडावी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार, रामजी कत्तीवार, कोंदावाहीचे भूमिया दुहे तलाडे, बंडू तलांडे, कोल्लू तलाडे, विजया तलाडे, संतोष तलांडे, येमली पेम्मा बिद्री तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जंगी स्वागत
अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यावर त्यांचा एटापली तालुक्यातील हा पहिलाच दौरा होता. त्या अनुषंगाने एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत केले.