ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी आढावा बैठकीत काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

सिरोंचात कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत

सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सिरोंचा नगरपंचायत सभागृहात तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. बैठकीत व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर), तहसीलदार जितेंद्र शिकतोडे आणि उपवनसंरक्षक पूनम पाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक, तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदारही उपस्थित होते.

सुरुवातीला आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हे काम कासवगतीने सुरू असल्याबद्दल धर्मरावबाबा यांनी नाराजी व्यक्त करत कंत्राटदाराला खडसावले. जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पुरपीडित लोकांसाठी काय केले याबद्दल तहसीलदारांना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले. मेडिगड्डा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना किती चेकचे वाटप झाले आणि किती देणे बाकी आहे यावरही विचारण्यात आले. ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली जाते अशा व्यक्तींचा लवकरात लवकर सर्वे करून त्याना न्याय द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत

कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सिरोंचात पहिल्यांदा आल्याबद्दल ना.धर्मरावबाबा यांचे कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव आणि मोठ्या हाराने जंगी स्वागत केले. राजराजेश्वरी स्वागत मंडपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी आणणारे, विकास करणारे नेते म्हणून धर्मरावबाबा आत्राम यांची ओळख असून त्यांच्या मंत्रीपदाचा या भागाला फायदा होईल असे सांगितले.