अन् खासदार अशोक नेते यांनी मैदानात उतरून टोलवला फुटबॅाल

जयनगरमध्ये उत्साहात सुरू झाली फुटबॅाल स्पर्धा

चामोर्शी : राजकीय मंडळी निवडणुकीच्या मैदानात उतरून एकमेकांच्या आरोपांची टोलवाटोलवी करताना नेहमीच पहायला मिळतात. मात्र चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथे आयोजित फुटबॅाल सामन्यांच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी फुटबॅालच्या मैदानावर जोरदारपणे फुटबॅालला किक मारून तो हवेत उडवत आपण खेळाच्या मैदानावरही चेंडू टोलवू शकतो हे दाखविले.

जयनगर येथील जयहिंद युवा कृषि बचत गटाच्या वतीने नेताजी कप फुटबॉल सामन्यांचे आयोजन गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी केले जात आहे. यावर्षी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी गावात प्रवेश करताच औक्षवण करत विद्यार्थ्यांनी बँड, लेझिमच्या तालावर त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना युवकांनी मैदानी खेळ खेळावे. या खेळांमुळे शरीर तंदुरस्त राहते. खेळामुळे शरीराचा व्यायाम होऊन आरोग्यसुद्धा चांगले राहते. खेळाबरोबरच युवकांनी सर्वांगिक विकास साधावा. स्पर्धेत वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम माणून खेळीमेळीच्या वातावरणात कोणतेही खेळ खेळावे, असे मार्गदर्शन खा.नेते यांनी केले.

या स्पर्धेत प्रथम बक्षिस खासदार अशोक नेते यांच्याकडून ५१,१११ रुपये, द्वितीय ३१,१११ रुपये सुशांत बेपारी चामोर्शी यांच्याकडून, तृतीय बक्षिस २१,१११ रुपये सुजित मुजुमदार, तर चतुर्थ बक्षिस ११,१११ रुपये बंधू महल जयनगर, विक्रमपूर यांच्याकडून दिले जाणार आहे.

या कार्यक्रमाला मंचावर युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, सरपंच श्रीकांत ओल्लालवार, माजी सरपंच प्रतिमा सरकार, ठाणेदार विजयानंद पाटील, सुशांत बेपारी, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू ढाली, अपूर्व वैद्य, देवकुमार मंडल, तमन मंडल, मुणाल हलदार, किशोर साना, रविना मंडल, सरोजित मंडल, राजेन मंडल, मिथुन बिश्वास, गौरीपूरचे सरपंच मुखर्जी, सुरेश राठोड, टोकण गाईन, हरेण हलदार, सुजित मुजुमदार, निरुपन गाईन यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.