गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या ग्यारापत्तीच्या जंगलात एका झोपडीत आढळलेल्या तीन जुन्या पद्धतीच्या सिंगल बोअर बंदुका नेमक्या कोणाच्या याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्या नक्षलवाद्यांच्या असल्याचा कयास बांधल्या जात असला तरी नक्षलवादी असे बंदुका सोडून जातात का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
जिल्ह्यात शिकारीसाठी अनेक लोकांकडे अशा पद्धतीच्या बंदुका वापरल्या जातात. अलिकडे पोलिसांच्या आवाहनानुसार बऱ्याच लोकांनी त्या बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत. मात्र अजूनही अनेक लोकांकडे बंदुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी पथकाच्या संयुक्त गस्तीदरम्यान सदर बंदुका दिसल्या. त्यामुळे परिसरात नक्षलवादी असण्याची शक्यता व्यक्त करत शोधमोहीम तीव्र करण्यात आली, पण कोणीही आढळले नाही.