काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा जिल्ह्यात ९ दिवसात २०० किलोमीटर फिरणार

कशी झाली सुरूवात, पहा व्हिडीओ

गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि.३) विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध मार्कंडा येथून जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात ही पदयात्रा ९ दिवसात २०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार हेसुद्धा या यात्रेत सहभागी होणार आहेत.

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी राज्यमंत्री मारोतराव कोवासे यांनी हिरवी झेंडी दाखवून या पदयात्रेची सुरूवात केली. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॅा.नितीन कोडवते, डॅा.चंदा कोडवते, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, माजी जि.प. सदस्य कविता भगत, वैशाली ताटपल्लीवार, राजेश ठाकूर, अब्दुल पंजवाणी, वामन सावसाकडे, रमेश चौधऱी, भारत येरमे, नेताजी गावतुरे, रजनिकांत मोटघरे, नितेश राठोड, रमेश कोडापे, दिगंबर धानोरकर, सुधीर शिवणकर, रोशन कोहळे, मुन्ना गोंगले यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यावर टिका करत सरकारच्या धोरणांचा पर्दाफाश करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा जिल्ह्यात फिरून जनजागृती करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.