गडचिरोली : महाराष्ट्राच्या संत परंपरेतील ज्येष्ठ संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सव समितीच्या वतीने रविवार, दि.१० रोजी गडचिरोलीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रा, समाजप्रबोधनपर व्याख्यान, उपवर-वधूंचा परिचय मेळावा, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कीर्तन असे कार्यक्रम होणार असून जवळपास पाच हजार समाजबांधव या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती जन्मोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, रमेश भुरसे, देवानंद कामडी, घनश्याम लाकडे, राहुल भांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
संत जगनाडे महाराज यांनी तत्कालीन अनिष्ठ रूढी, परंपरा व अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढून विज्ञानवादी दृष्टिकोन रूजविण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या योगदानाची आठवण म्हणून यावर्षी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जात आहे.
असे राहतील दिवसभरातील कार्यक्रम
सकाळी ११ वाजता सर्वोदय वॅार्डातील संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या सभागृहातून शोभायात्रा निघणार आहे. दुपारी १२ वाजता संभाजीनगर येथील संत साहित्याचे अभ्यासक प्रा.विजय गवळी यांचे ‘संताजी महाराजांचे चरित्र, समाजाची दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी ‘संताजी एक योद्धा’ या कादंबरीचे लेखक संजय येरणे राहतील. दुपारी २ वाजता उपवर युवक-युवतींचा वधू-वर परिचय मेळावा, तर दुपारी ३ वाजता वर्धा येथील प्रबोधनकार तथा सप्तखंजिरीवादक दीपक महाराज भांडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तेली समाजबांधांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जन्मोत्सव समितीने केले आहे.