जीवाचा धोका पत्करून गावकऱ्यांनी वाचवले वाहत जाणाऱ्या तिघांचे प्राण

पुराच्या पाण्यात दुचाकी गेली वाहून

गडचिरोली : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न तिघांच्या जीवावर बेतला होता. पण गावकऱ्यांनी समयसुचकता दाखवत जीवाचा धोका पत्करून त्यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांना वाचवले. या घटनेत प्राण वाचविणाऱ्या गावकऱ्यांचे कौतुक करत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी असा धोका पत्करून कोणीही पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.

ही घटना गुरूवारी (दि.25) चुरचुरा माल जवळ सायंकाळी 7 ते 8 वाजतादरम्यान घडली. चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नालावरून पाणी वाहात असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे (32 वर्ष), आशा किशोर मेंढे (65 वर्ष) आणि त्यांचा भाचा दत्तश्री शरद गोडे (12 वर्ष ) हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोलीवरून नागपूरला जात होते. नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी पुलावर गाडी टाकली. पण मध्येच अडकून थोडे वाहात जाऊ लागले. त्यांनी वाचविण्यासाठी आरडाओरड केली. त्यामुळे चुरचुरा गावातील अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावले. यावेळी दुचाकी वाहन पाण्यात वाहून गेले, पण त्या तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले.

त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची चमू, तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे यांनी त्यांना गावात आणले. आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये, अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.