अहेरी : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील धर्मराव कृषी विद्यालयाच्या मॅाडेलने उच्च माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता नववीतील विद्यार्थी गौरव गौतम बैरागी यांना द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
12 ते 15 जानेवारीपर्यंत गडचिरोलीतील कमलताई मुनघाटे महाविद्यालयात हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. अहेरीच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गौरवने सादर केलेला विज्ञानाचा प्रयोग अव्वल ठरल्याने त्याची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली होती. त्यात द्वितीय क्रमांक पटकाविल्याने आता राज्य स्तरावर त्याचे निवड झाली. कृषी संशोधनावर आधारित ‘रोबोटिक सायन्स’ या विषयावर त्याने प्रयोग सादर केला. राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी जयश्री खोंडे यांच्या मार्गदर्शनात गौरवने हे यश मिळविले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम, शाळेचे प्राचार्य अनिल भोंगळे आदी अनेकांनी त्याचे कौतुक केले.
शेतकऱ्यांसाठी प्रयोग ठरणार फलदायी !
कृषी क्षेत्राशी निगडित रोबोटिक सायन्स, अर्थात मल्टिपर्पज ॲग्रो हेल्पर या प्रयोगासाठी अनेक महिन्यांपासून परिश्रम सुरू होते. शेतकऱ्यांना अलीकडे पेरणी, कापणी, कचरा काढणे व निंदन यासाठी मजुरी आणि शेतीवरील अन्य खर्च परवडण्यासारखा नसल्याने ‘रोबोटिक सायन्स’च्या माध्यमातून नावीन्यपूर्ण प्रयोग सादर करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यानुसार ‘प्रायोगिक तत्वावर’ विज्ञान प्रदर्शनात हे मॅाडेल बनवून सादर केले. भविष्यात हा प्रयोग शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी फलदायी ठरेल, असा विश्वास प्रयोगाच्या मार्गदर्शक जयश्री खोंडे यांनी व्यक्त केला.