सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी छगन शेडमाके यांच्यावर गुन्हा नोंदवा

विठ्ठलगावच्या बौद्ध समाजबांधवांची मागणी

देसाईगंज : तालुक्यातील विठ्ठलगाव येथील संरक्षण भिंतीच्या वादात आदिवासी काँग्रेसचे छगन शेडमाके यांनी अवाजवी हस्तक्षेप केला. याशिवाय गावातील नागरिक, ग्रामपंचायत प्रशासन यांच्याबद्दल तथ्यहीन तक्रार आणि खोट्या बातम्या पसरवून सामाजिक सलोखा बिघडविल्याने त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार विठ्ठलगाव येथील बौद्ध समाजबांधवांनी केली आहे.

विठ्ठलगाव येथील रहिवासी घनश्याम नागो लांडगे यांना समाजाने, गावाने बहिष्कृत केले असल्याचे खोटे सांगत शेडमाके यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांचा वापर करून घेतला. त्यासंदर्भातील बातम्या प्रकाशित झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक सालोखा टिकून राहावा यासाठी शेडमाके यांचे आरोप बिनबुडाचे आहेत अशी बाजु गावातील १०० नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन सांगितली. मात्र त्यानंतर शेडमाके यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. वास्तविक अशा पद्धतीने सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी शेडमाके यांच्यावर कावाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन केली.

गावातील बौद्ध विहाराच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे समाजाने त्या वादग्रस्त बाजुच्या जागेवर कुठलेही संरक्षण भिंतीचे बांधकाम केलेले नाही. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कुठलेही बांधकाम करणार नाही, असेही समाजाने आधीच मान्य केलेले आहे. असे असताना शेडमाके यांनी विठ्ठलगावला येऊन घनश्याम लांडगे यांना भडकावले. त्यामुळे लांडगे यांनी न्यायालयीन निर्णयाची वाट न पाहता संबंधित जागा आपल्या ताब्यात घेऊन वहिवाट सुरु केली. त्यामुळे गावातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सामाजिक कलह वाढविणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून कायदेशिर कारवाई करावी, अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विठ्ठलगावच्या बौध्द समाजाने गावातील नागरिकांनी दिला आहे.