गडचिरोली : उच्च शिक्षण घेऊनच आजकाल नोकऱ्या मिळत नाही, तिथे कमी शिक्षण घेतलेल्या युवकांना नोकरी कोण देणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. मात्र हैदराबादच्या कॅप्स्टन फॅसिलिटीज मॅनेजमेंट लिमिटेड या एजन्सीकडून सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझरच्या पदभरतीसाठी गडचिरोली जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे घेतले जाणार आहेत. येत्या 25, 26, 29 आणि 30 मे अशा चार दिवसात हे मेळावे होणार असून त्यात योग्य उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
ही एजन्सी मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बँका, खाजगी कार्यालये, उद्योग व कंपन्या, संस्था व शाळा, दवाखाने इ.ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पुरविण्यासाठी विविध राज्यात काम करते.या एजन्सीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. वयाच्या 60 वर्षांपर्यंत ESIC, पेंशन, ग्रॅज्युइटी, बोनस, निवास, वार्षिंक वाढ आणि पदोन्नती इ.राज्य सरकारच्या वेतनाच्या नियमानुसार दिल्या जाणार आहे. म्हणजेच उमेदवारांना 14500/- ते 18500/- असा पगार मिळू शकतो.
गार्डसाठी पात्रता 8 वी ते 10 पास/नापास, उंची 165 सेंमी, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. तर सुपरवायझर पदासाठी पात्रता पदवीधर आणि NCC चे “C” Certificate, उंची 172 सेंमी, 30 ते 35 वर्षे वय आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक (मुळ व झेराँक्स), पोलीस व्हेरीफिकेशन, पासपोर्ट, MBBS डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. सदर समुपदेशन मेळावा हा केवळ पुरुषांकरिता आहे.
चामोर्शी व मुलचेरा तालुक्यासाठी 25 मे रोजी मेळावा होणार असून तो पंचायत समिती सभागृह मुलचेरा येथे सकाळी 11 ते 3 पर्यंत, दि.26 ला देसाईगंज व आरमेारी तालुक्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज आणि पंचायत समिती सभागृह आरमेारी येथे, तसेच दि.29 ला गडचिरोली व धानोरा तालुक्याचे मेळावे पंचायत समिती सभागृह, धानोरा येथे, तर दि.30 ला कोरची व कुरखेडा तालुक्याचे मेळावे पंचायत समिती सभागृह, कुरखेडा येथे होणार आहेत, आहे असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.