गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (दि.19) गडचिरोलीसह जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोलीत संध्याकाळी टायगर ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहर दणाणून गेले. इंदिरा गांधी चौकात तयार केलेली किल्ल्याची प्रतिकृती, त्यात सिंहासनावर विराजमान शिवरायांची मूर्ती आणि मिरवणुकीत शिवरायांच्या वेशभुषेत अश्वारूढ युवक, त्या अश्वाचे दोन्ही पाय उंचावत नाचणे हे विशेष आकर्षण ठरले.
सुरूवातीला गांधी चौकात उभारलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीमधील शिवरायांच्या पुतळ्याचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पुजन करण्यात आले, तर आ.डॅा.देवराव होळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या हस्ते ५० फूट उंच शिवरायांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी दुपारी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनीही शिवरायांच्या पुतळ्याना अभिवादन केले. ढोलताशाच्या गजरात शहराच्या मुख्य मार्गाने रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.
विविध ठिकाणच्या शिवजयंतीला खासदारांची उपस्थिती
गडचिरोली शहरासह विविध ठिकाणच्या शिवजयंती कार्यक्रमांना खासदार अशोक नेते यांनी उपस्थिती दर्शवून शिवप्रेमींचा उत्साह वाढविला. येथील महिला महाविद्यालय परिसरात व इ़ंदिरा गांधी चौकात, तसेच वाकडी या ठिकाणी खासदार नेते यांनी शिवजयंती सोहळ्यास उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी खासदार नेते यांनी आलुभाताच्या अल्पोपहाराचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुद्रित असलेल्या टि-शर्टचे वाटप केले. वाकडी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून खा.नेते यांच्या हस्ते भूमिपूजन करून या पुतळा उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.