गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिस दलासोबत घातपात घडविण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोमवारी उधळल्या गेला. कुरखेडा उपविभागाअंतर्गत कोटगुलजवळील पहाडाच्या पायथ्याजवळच्या पायवाटेवर नक्षलवाद्यांनी कुकर बॅाम्ब पेरून ठेवला होता. बॅाम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असताना हा बॅाम्ब आढळला. त्या बॅाम्बमध्ये जवळपास दोन किलो स्फोटकं होती. तो बॅाम्ब त्याच ठिकाणी नष्ट करण्यात आला.
कोटगुल पोलिस स्टेशनपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाला लक्ष्य करत घातपात घडवण्याच्या उद्देशाने जमिनीत स्फोटके पुरुन ठेवली होती. यासंदर्भातील गोपनिय माहिती कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना कळविताच त्या ठिकाणी बॅाम्ब शोधक आणि नाशक पथकाला (बीडीडीएस) पाठवण्यात आले.
बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असताना, एक संशयित जागा मिळून आल्याने तिथे पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट खोल जमिनीमध्ये स्फोटक पदार्थ भरुन असलेला प्रेशर कुकर मिळून आला. त्याची बिडीडीएस पथकाने एक्सप्लोझिव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे 2 किलो स्फोटके असल्याची खात्री झाली. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात कोटगुल पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथकाचे प्रभारी मयुर पवार, पोहवा पंकज हुलके, पोहवा अनंतराव सोयाम, अंमलदार संचिन लांजेवार व चालक तिम्मा गुरनुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली. माओवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.