गडचिरोली : जिल्ह्यातील वनावर अवलंबून उपजीविका करणाऱ्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत जंगलालगतच्या गावांमधील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी वनविभागाकडून तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातून 150 प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.
हॅास्पिटलिटी मॅनेजमेंट (आदरातिथ्य व्यवस्थापन) हे या दोन महिन्याच्या प्रशिक्षणासाठी 8 वी पास व एक वर्षाचा अनुभव किंवा 10 वी पास अशी पात्रता असून जिल्ह्यातील पाचही वनविभागांमधून प्रत्येकी 10, असे 50 प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत. दुसरे प्रशिक्षण इलेक्ट्रीक अप्लाएन्स रिपेअर हे प्रशिक्षणही दोन महिने कालावधीचे असून त्यासाठी 10 वी पास ही पात्रता आहे. तिसरे जेसीबी आॅपरेटरचे प्रशिक्षण एक महिन्याचे आहे. त्यासाठी 8 वी पास व 1 वर्ष अनुभव किंवा 10 वी पास अशी पात्रता आहे. या तीनही प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 50 प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत.
या प्रशिक्षणासाठी जंगलालगतच्या गावांमधील युवक-युवतींना डॅा.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार असल्याचे गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एस.रमेश कुमार यांनी सांगितले.