गडचिरोली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजनेअंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी झाली आहे, मात्र त्यात सर्वात कमी प्रतिसाद गडचिरोली जिल्ह्यात असून अवघ्या 294 उमेदवारांनी नोंदणी केलेली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजनेअंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त बिदरी यांनी दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त बिदरी यांनी अभिनंदन केले. इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
धानोरा येथील सोनाली गेडाम यांनी बिएससी व एमएससीआयटी या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये होणार नियुक्ती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम् या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनांमध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त बिदरी यांनी दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.