अहेरी : अहेरी ते प्राणाहिता कॅम्पदरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विषयावर ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी नाराजी व्यक्त करत हे खड्डे तत्काळ बुजवून हा रस्ता रहादारीयोग्य करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. विशेष म्हणजे अहेरी ते आलापल्लीपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी ना.आत्राम यांनी 6 कोटींचा निधी मंजूर करून दिला असताना हे काम मध्येच का थांबविण्यात आले, या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मात्र पावसाळ्यामुळे हे काम थांबलेले असल्याचे सांगत पाऊस थांबताच काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अभियंता पारेलीवार यांनी स्पष्ट केले.
संदर्भाने उपविभागीय अभियंता पारेलीवार, कनिष्ठ अभियंता आडेपू, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, अरुण मुक्कावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, विधानसभासभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, बाबुराव तोरेम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, संदीप पूजलवार, मखमूरभाई, रहमान शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याची पाहणी केली. हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात लगेच बुजवून पक्के काम पावसाळ्यानंतर लगेच करण्याची हमी अभियंता पारेलीवार यांनी दिली.
या कामासाठी मंजूर असलेल्या 6 कोटींच्या निधीमधून आलापल्ली ते प्राणहितापर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले असून प्राणहिता ते अहेरीपर्यंतचे काम पावसाळ्यामुळे थांबविण्यात आले आहे. ना.आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांना मंजुरी मिळवून दिली आहे. त्यापैकी अहेरी ते महागाव, अहेरी ते देवलमारी, अहेरी ते खमनचेरू हे अहेरीलगतचे सर्व रस्ते पूर्ण झाले असून ना.आत्राम यांच्या पुढाकाराने अनेक रस्त्यांचे प्रश्न सुटले आहेत. आलापल्ली ते अहेरी हे कामही पावसाळ्यानंतर पूर्ण होणार आहे.