दक्षिण गडचिरोलीसाठी अहेरीत सुरू होणार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय

२२ जुलैला उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आणि सिरोंचा या तालुक्यांमधील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी गडचिरोलीला जाणे सोयीस्कर होत नसल्याने अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची सुरूवात होणार आहे. येत्या २२ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्या.भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर न्यायालयाचे लोकार्पण होणार आहे.

अहेरी अधिवक्ता महासंघाच्या लढ्याचे आणि तत्कालीन पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे मानले जात आहे. दक्षिण गडचिरोलीकडच्या दुर्गम भागातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे गडचिरोलीऐवजी अहेरीला जिल्हा व सत्र न्यायालय असणे सर्वांच्या सोयीचे होते. अनेक वर्षांपासून त्यासंदर्भात मागणी केली जात होती.

तब्बल एक तपापासून अहेरी तालुका अधिवक्ता महासंघाचा यासाठी संघर्ष सुरु होता. फाईल मंत्रालयात रखडली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी अधिवक्ता महासंघाच्या सदस्यांना मुंबईला पाचारण करुन या प्रक्रियेला वेग आणला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ मंजुरीही दिली होती. परंतु नंतरच्या सरकारमध्ये हे काम रखडले होते. पुन्हा सरकार बदलल्यानंतर अम्ब्रिशराव यांनी पुन्हा पाठपुरावा करत हे काम मार्गी लावले.