800 ज्येष्ठ नागरिक वातानुकूलित रेल्वेने वाजतगाजत अयोध्या तीर्थयात्रेसाठी रवाना

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून मोफत प्रवास

गडचिरोली : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक वडसा रेल्वे स्थानकावरून विशेष वातानुकूलीत रेल्वेगाडीने अयोध्येला मार्गस्थ झाले. आमदार कृष्णा गजबे व सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, उपायुक्त मधुसूदन धारगावे, तहसीलदार प्रिती डुडुलवार यावेळी उपस्थित होते.

60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यात कोल्हापूर, जळगाव, मुंबई व भंडारानंतर तीर्थदर्शनची ही रेल्वे गडचिरोली जिल्ह्यातून रवाना झाली. तीर्थदर्शनाला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात वडसा रेल्वेस्थानक परिसर दणाणून सोडला होता.

सामाजिक न्याय विभागाद्वारे ढोलताशात व पुष्पहाराने प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आमदार गजबे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेप्रति जिल्हा प्रशासनाच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले.

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत नाश्ता, जेवन यासोबत औषधी, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे व त्यांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे आणि रेल्वेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे डॉ.सचिन मडावी यांनी सांगितले.

रेल्वेस्थानकावर विविध विभागांचे अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच तीर्थदर्शनासाठी निघालेल्या नागरिकांना निरोप देण्यासाठी जमलेले त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.