पुणे : राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नव्हते. मात्र, मंगळवारी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अजितदादांचे काही मेळावे आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान बारामतीतील कार्यकर्त्यांनी अजितदादांचा ताफा थांबवून, जोरदार घोषणाबाजी करत आम्हाला फक्त तुम्हीच उमेदवार हवे, असे म्हणत त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अजितदादांनी, “तुमच्या मनातलाच उमेदवार बारामतीत देणार” असे आश्वासन दिले. त्यामुळे आता अजितदादा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. यानिमित्ताने अजितदादांच्या उमेदवारीवरून नागरिक किती संवेदनशिल आहेत याचा प्रत्यय आला.