देशाची महासत्तेकडे वाटचाल हे ७५ वर्षातील प्रयत्नांचे फलित- श्रीमंत माने

गोंडवाना विद्यापीठात अभ्यासपूर्ण व्याख्यान

स्मृतिचिन्ह देऊन श्रीमंत माने यांचे स्वागत करताना प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे, कुलसचिव डॅा.हिरेखण व इतर मान्यवर.

गडचिरोली : आपल्यासमोर आज असलेल्या अनेक प्रश्नांची सोडवून राज्यघटनेतून होऊ शकते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशाने कशी वाटचाल केली याची जाणीव लोकांना नाही. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जिथे सुईसुद्धा बनत नव्हती तो देश आज महासत्तेकडे वाटचाल करत आहे. हे गेल्या ७५ वर्षातील प्रयत्नांचे फलित आहे. त्यामुळे या प्रवासातील सर्व लोकांबद्दल आणि भारतीय राज्यघटनेबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि विचारवंत श्रीमंत माने यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठात बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून ‘राज्यघटनेने सामान्य भारतीयांना काय दिले?’ या विषयावर माने यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे होते. यावेळी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, डॅा.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.दिलीप बारसागडे, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक आनंद डेकाटे आदींची विशेष उपस्थिती होती.

यावेळी श्रीमंत माने यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रथा-परंपरांमागील पार्श्वभूमी सांगत राज्यघटनेमुळे समाज कसा जागरूक झाला याचे विश्लेषण केले. अनेक एेतिहासिक दाखले देत त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक सामाजिक प्रश्नांची उकल कशी झाली हे स्पष्ट केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात वाचन केले होते, त्या आधारावर प्रत्येक मुद्दा त्यांनी स्पष्ट केला. राज्यघटना आजही आपण समजून घेत नाही. आपण जी संविधानाची उद्देशिका वाचतो ती समजून घेतली पाहिजे. तरच या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.

व्याख्यानाच्या सुरूवालीला संविधानाची उद्देशिका आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी वाचन केले.

प्रास्ताविक डॉ.दिलीप बारसागडे, संचालन प्रा.डॉ.हेमराज निखाडे यांनी तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ.प्रीती काळे आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.