गोंडवाना विद्यापीठात आजपासून दोन दिवस क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन

शिक्षकांचे खेळ आणि कलांचे प्रदर्शन

गडचिरोली : शिक्षकांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळ आणि कलेप्रती उत्साह निर्माण व्हावा याकरीता गोंडवाना विद्यापीठातील, तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांकरीता दि.19 व 20 मार्चला शिक्षक क्रीडा व कला महोत्सव “कलादर्पण-2024” चे आयोजन करण्यात आले आहे.

गोंडवाना विद्यापीठ परिसरात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि.19 रोजी सायंकाळी 5 वाजता कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अमुदाला चंद्रमौली, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, तसेच नागपूर, हार्मोनी इव्हेंटचे संचालक राजेश समर्थ, गायक प्रफुल्ल सांगोळे आणि कलर्स उपविजेती, स्वर्ण स्वर भारत, इंडियन आयडल फेम स्वस्तिका ठाकूर आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे.

सदर शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचा समारोप बुधवार, दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी सिंदेवाहीचे सुप्रसिद्ध नाट्यकलावंत प्रा.डॉ.शेखर डोंगरे, वडसा येथील नाट्यलेखक, दिग्दर्शक व नाट्यकलावंत युवराज प्रधान, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ.अनिता लोखंडे यांची उपस्थिती राहील.