जलजागृती सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन, ७५ हजार विद्यार्थ्यांना दिली जलप्रतिज्ञा

पुनर्वापरातून पाण्याची बचत करा – साळुंखे

गडचिरोली : पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असून पुनर्वापरातून पाण्याची बचत करा, असे आवाहन कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांनी केले. जलजागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलजागृती अभियानाचा शुभारंभ साळुंखे यांच्या हस्ते गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी इंगोले, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव पाटील, जलसंवर्धनचे सामाजिक कार्यकर्ता प्रकाश अर्जुनवार, मनोहर हेपट, लॅायड्स मेटल्सचे संचालक विक्रम मेहता, बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक मयुर कडबे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता मोरघडे यांनी प्रास्ताविकातून जलजागृती सप्ताहाचा उद्देश व जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत रुपरेषा सादर केली. जलजागृती सप्ताहाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन, जल प्रदुषण, पाण्याची गुणवत्ता राखणे याविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकरीता सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये जलप्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हास्तरावर सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन भाऊ भांडेकर, तर आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले. उपस्थितांनी याप्रसंगी सामुहिक जलप्रतिज्ञा घेतली.