गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडाविषयक प्रतिभांचे भंडार असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी केले. आठ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अडसूळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
निसर्गतःच प्रचंड क्षमता असलेले प्रतिभावान खेळाडू गडचिरोली जिल्ह्यात असून त्यांना योग्य मार्गदर्शन व योग्य संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रत्येक गावात गावस्तरीय क्रीडा शाळाही सुरू करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. गावागावात असलेल्या मैदानात स्थानिक युवकांना मोफत मार्गदर्शनाबरोबरच आधुनिक क्रीडा क्षेत्राबद्दलची माहिती दिली तर निश्चितच ते भविष्यात देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पाहतील अशी आशा अडसूळ यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, प्रमुख अतिथी तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रणय खैरे उपस्थित होते. आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथून प्रशिक्षण घेऊन आलेल्या १० प्रशिक्षकांसह गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
खेळात आरोग्य आहे, शिक्षण आहे, मैत्री आहे, जीवन आहे, त्याचबरोबर खेळात जग जवळ करण्याची ताकदही आहे. गावागावातील शाळांमधून क्रीडा विषयक मार्गदर्शन मुलांना त्या-त्या वयातच दिले तर त्यांची शरीरयष्टी त्या खेळासाठी निश्चित वेळेत तयार होईल. यातूनच त्या खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होऊन ते जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवतील, असे सचिन अडसूळ यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. बदलत्या क्रीडा क्षेत्रातील धोरणानुसार आता वेगवेगळ्या स्तरावर सामन्यांचे आयोजन करून त्यातून आर्थिक फायदाही खेळाडूंना होत आहे. क्रीडा क्षेत्राला व्यावसायिकतेची जोडही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिभांचे भंडार असलेल्या युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्याचे कार्य सर्व शिक्षकांनी मिळून केले पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.