यावर्षी ९२ हजार विद्यार्थी देणार ‘गोंडवाना’ची परीक्षा

गडचिरोलीतील आठ परीक्षा केंद्र अतिसंवेदनशिल

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा येत्या मंगळवार ९ मे पासून सुरू होत आहेत. यावर्षी तब्बल ९२ हजार ८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
विद्यापीठच्या परिक्षेत्रातील चंद्रपूर जिह्यात ४३ आणि गडचिरोली जिल्ह्यात २४ असे एकूण ६७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली, आल्लापल्ली मूलचेरा, सिरोंचा, मालेवाडा ही आठ परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांनी कळविले. पदव्युत्तर पदवीकरिता १६ हजार,७५३ तर पदवी परीक्षेकरिता ७५ हजार ३३६ असे एकूण ९२,०८९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.