एसटी प्रवर्गात राज्यात द्वितीय येऊन सुरज कोडापेंची एमपीएससीला गवसनी

पीएसआय म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं.2 या गावच्या सुरज कोडापे या तरुणाने राज्यसेवा परीक्षेत (एमपीएससी) अनुसूचित जमाती प्रवर्गात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातल्याबद्दल औचित्य साधून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी सुरज कोडापे यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

काही दिवसांपूर्वीच एमपीएससीने पोलिस उपनिरीक्षकपदासाठी 2021 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात सुरज कोडापे यांची निवड झाली होती. विशेष म्हणजे सुरज हे सामाजिक चळवळीत काम करत असल्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरज यांच्या गावातील घरी जाऊन डॉ.होळी यांनी त्यांचे कौतुक करत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला. तसेच पुढील प्रशासकीय सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणी प्रियांका देवतळे आणि कल्याणी दुर्गे, तसेच भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, रोशन कुमरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रतीक राठी, सोनू कुमरे, सौरव गौरकर, कृष्णा नैताम, संतोष चिचघरे उपस्थित होते.