गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्यास केंद्र, विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची सोय

कुलगुरू डॉ.बोकारे यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) अभ्यास केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या अभ्यास केंद्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.संजय गोरे, डॉ.नंदा सातपुते, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) नागपूर क्षेत्रीय निर्देशक डॉ.लक्ष्मण कुमारवाड, सहायक क्षेत्रीय निर्देशक डॉ.व्यंकटेश्वरलू, अनुभाग अधिकारी चंद्रशेखर राजगुरे, ब्रम्हपुरी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.राजन वानखेडे, समन्वयक डॉ.प्रिती पाटील आदी उपस्थित होते.

कोणाला कसा होईल फायदा?

घरची परिस्थिती किंवा विविध अडचणींमुळे कॉलेजला जाणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच नोकरी-व्यवसाय सांभाळून अर्धवट राहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘इग्नू’ हा एक उत्तम पर्याय आहे. या माध्यमातून विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन शिक्षण आणि स्वप्न पूर्ण करू शकतात. काम करता-करता शिक्षण व शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना नव्याने शिक्षण घेण्याची, तसेच अर्धवट राहिलेले उच्च शिक्षण पुर्ण करण्याची संधी गोंडवाना विद्यापीठात कार्यान्वित इग्नू अभ्यास केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुक्त व दूरस्थ शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम

इग्नू अध्ययन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, सर्टिफिकेट इन रुरल डेव्हलपमेंट, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन फूड अँड न्यूट्रिशन, मास्टर ऑफ आर्ट (रुरल डेव्हलपमेंट) आदी अभ्यासक्रम असणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरीता, तसेच अधिक माहितीकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) अभ्यासकेंद्राच्या समन्वयक डॉ.प्रिती पाटील (8275399300) यांच्याशी संपर्क साधावा, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले.