गडचिरोली : वाकडी येथील श्री साई इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंगमध्ये सूर्यनमस्कार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या समन्वयक सचिव वैशाली साळवे आणि प्राचार्य उत्तम खंते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माधुरी दहीकर, अंजली कुळमेथे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरूवातीला अतिथींनी सूर्यनमस्काराचे महत्व विद्यार्थ्यांना समजावले. सूर्यनमस्कार हा शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शरीरात लवचिकता, ताजेपणा आणि उर्जा वाढते असे सांगत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
हा दिवस विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक अनुभव देणारा ठरला. शारीरिक तंदुरूस्ती आणि मानसिक शांतीमध्ये संतुलन साधन्यासाठी नियमितपणे सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी केला.