सुरजागड लोहखाणीचे विस्तारीकरण हे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक

गडचिरोली : सुरजागड हा प्रकल्प गडचिरोलीच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक ठरेल. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा मागासलेपणाचा ठप्पा पुसल्या जाऊन देशाच्या औद्योगिक नकाशावर स्थान मिळेल. याशिवाय स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, त्यातून जिल्ह्याचा सर्वांगिन विकास होईल, असा विश्वास माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी व्यक्त केला.

लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या क्रशिंग आणि स्क्रिनिंग प्लांटची क्षमता वाढविण्याबाबत मंगळवारी झालेल्या जनसुनावणीप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित या जनसुनावणीला लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येने प्रभावक्षेत्रातील गावांमधील नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी खा.नेते यांनी पर्यावरणीय जबाबदारीवरही भर दिला. जैवविविधतेचे संरक्षण करत शाश्वत विकास साधण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. इतिहासाचा दाखला आणि प्रकल्पाचे महत्व सांगत त्यांनी 19 व्या शतकातील इतिहासाला उजाळा दिला. त्या काळी सुरजागड येथे टाटा समूहाने प्रकल्प उभारण्याचा विचार केला होता. परंतु रस्ते व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे तो प्रकल्प साकार झाला नाही. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी बी.प्रभाकरन यांनी हा प्रकल्प पुढे नेण्याचे भरीव कार्य केल्याने त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सुरजागड आणि हेडरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जनसुनावणीत हजेरी लावली. त्यांनी रोजगार, पर्यावरणीय परिणाम आणि प्रकल्पाच्या प्रभावाशी संबंधित आपली मते मांडली. नागरिकांनी मांडलेल्या शंकांचे निरसन कंपनीच्या वतीने करण्यात यावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

अनेक मान्यवरांची होती उपस्थिती

या जनसुनावणीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, खा.डॉ.नामदेव किरसान, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आ.डॉ.मिलिंद नरोटे, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.