कुरखेडा : पोलीस बनण्याचे स्वप्न रंगवत सराव करणाऱ्या रोहीत राजेंद्र तुलावी (20) (रा.उपरीकर टोली, ता.कुरखेडा) या युवकाचा मृतदेह शनिवारी सती नदीच्या पात्रात आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे गूढ कायम आहे. घटनास्थळी त्याने उलटी केलेली होती. त्यामुळे त्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या रोहीतचे पोलीस बनण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान शनिवारी सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रोहीत नदीपात्रात उघड्या अंगाने पडून असल्याचे आढळले. काही लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याला कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॅाक्टरांनी मृत घोषित केले. रोहीतच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या.
रोहीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे कुरखेडा पोलिसांनी स्पष्ट केले.