नवनिर्मित पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन सोहळा

गडचिरोली : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माओवादविरोधी अभियानात आपल्या जीवाची पर्वा न करता शौर्याचे प्रदर्शन करणाऱ्या 5 पोलीस नाईक अंमलदारांना पोलीस हवालदार व एका पोलीस हवालदाराना सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर वेगवर्धितत पदोन्नती देण्यात आली. त्यांचा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर पोलीस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे नवनिर्मित पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात गावातील दिडशेवर नागरिकांच्या उपस्थितीत पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

याशिवाय गडचिरोली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले. अतिदुर्गम अशा माओवाद प्रभावित पेनगुंडा येथे पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. पोमके हद्दीतील सुमारे 150 ते 200 नागरिक माओवाद्यांच्या पोकळ धमक्यांना न जुमानता या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अनेक पोलीस मदत केंद्र स्तरावर क्रिकेट आणि व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

कोनसरीत नवीन बिटची निर्मिती

आष्टी पोलीस स्टेशनअंतर्गत कोनसरी या औद्योगिक नकाशावर आलेल्या गावात व आजुबाजुच्या परिसरातील गावांतील लोकसंख्येमध्ये वाढ झाल्याने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कोनसरी बाजारवाडी येथे राष्ट्रध्वज फडकवून कोनसरी बिट कार्यान्वित करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) डॉ.श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, आष्टी ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. विशाल काळे व इतर अधिकारी तथा अंमलदार, तसेच कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.