जि.प.शाळांच्या ‘त्या’ 27 शिक्षकांची प्राथमिक शिक्षक म्हणून गच्छंती

संधीचे सोने करणे जमलेच नाही

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदवीधर विषय शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असताना शासनाने 2016 मध्ये बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षकांच्या जागेवर पदस्थापना दिली होती. त्यासाठी त्यांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेणे बंधनकारक होते. पण त्यातील 27 शिक्षकांनी दिलेल्या मुदतीत पदवी प्राप्त केली नाही. शासनाने दिलेल्या संधीचे सोने करणे त्यांना शक्य झाले नसल्याने अखेर त्या 27 शिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून पदावनत करण्यात आले. याशिवाय त्यांनी पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा लाभ घेतला असल्यास ते अतिरिक्त वेतन त्यांच्याकडून वसुल केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान व गणित विषय शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षकांची कमतरता असल्याने विज्ञान शाखेतून बारावी झालेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षकांच्या जागेवर समायोजन केले होते. याचवेळी त्यांना मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे, असेही सुचविण्यात आले होते. त्यानुसार काही शिक्षकांनी पदवी प्राप्त केली. पण ज्या शिक्षकांनी दिलेल्या मुदतीत पदवी घेतली नाही, त्यांच्यावर पदावनतीची (डिमोशन कारवाई शिक्षण विभागाने केली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या २७ शिक्षकांना मूळ आस्थापनेवर रूजू होण्याचे पत्र दिले आहे, त्यांनी विषय शिक्षकांसाठी लागू असलेल्या वेतनश्रेणीचा लाभ घेतला असल्यास ते अतिरिक्त वेतन त्यांच्याकडून वसुल केले जाणार आहे. भविष्यात विषय शिक्षकांना शासनाच्या सुधारित धोरणानुसार १०० टक्के वेतनश्रेणी लागू करण्याची कार्यवाही झाल्यास त्यांना वेतनश्रेणीकरिता हक्क बजावता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.