जीवघेणा हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जुन्या वादातून डोक्यावर केले वार

गडचिरोली : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी काठीने डोक्यावर मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे गेल्यावर्षी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरमोरी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मानापूर येथे 25 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी चेतन प्रकाश ढवळे याचे काका विजय ढवळे हे नितीन पान सेंटरवर बसून असताना आरोपी अमोल उद्धवराव साखरे (34 वर्षे) याने ढवळे यांच्यावर हल्ला करत काठीने डोक्यावर मारून रक्तबंबाळ केले. जखमी विजय हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून होते, त्याचवेळी आरोपी अमोल हातात काठी घेऊन चौकामधून घराकडे जाताना दिसला. गावातील नातेवाईकांनी विजय ढवळे यांना पाणी पाजून देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्यानंतर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

दरम्यान आरमोरी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कलम 307 अन्वये गुन्हा नोंद केला. पण अनेक दिवसानंतर शुद्धीवर आल्यावर जखमी विजय ढवळे यांचे बयान घेतले असताना त्यांनी सांगितले की, एक वर्षाअगोदर पुतण्या चेतन ढवळे याच्या घरी पाहुणे आले असताना अमोल साखरे याने पाहुण्यांच्या गाडीचे दोन्ही आरसे तोडुन नुकसान केले होते. त्यावेळी अमोल साखरे याच्यासोबत वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून अमोल याने विजय ढवळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्राचा तपास पोनि.संदीप मंडलीक यांनी केला.