मतमोजणीच्या ठिकाणी 900 सुरक्षा रक्षक, टप्प्याटप्प्यावर तपासणी, मोबाईलला नो एन्ट्री

कशी होती आतील व्यवस्था, पहा झलक

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी यावेळी अभूतपूर्व असा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलिस दलाच्या मिळून तब्बल 900 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. आयटीआय चौकापासून तर शासकीय विश्रामभवनापर्यंत आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणापर्यंत पोहोण्यासाठी अनेक टप्प्यांवर मेटल डिटेक्टर आणि तपासण्यांमधून जावे लागत होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशिवाय (मीडिया रुमपर्यंत) इतर कोणालाही आतमध्ये मोबाईल नेण्यास मनाई होती.

गेल्या 19 एप्रिलला मतदार आटोपल्यापासून आतापर्यंत शासकीय कृषी महाविद्यालयात त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम सव्वा महिन्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी संजय दैने, तसेच निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांच्या उपस्थितीत सीलबंद स्ट्र्राँग रूममधून बाहेर काढण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय टेबलची व्यवस्था आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था केली होती. एकूण 97 टेबलवर ही मतमोजणी झाली.

लोकसभा मतदार संघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी वेगवेगळ्या कक्षात ठेवली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबल लावले होते. विशेष म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्याआधीच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील 17 क्रमांकाच्या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्याने त्यातील मते पाहणे शक्य होत नव्हते. संबंधित अभियंत्यामार्फत बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान व्हीव्हीपॅट मधील नोंदीच्या माध्यमातूनही त्या मतांची मोजणी करण्याची पर्यायी व्यवस्था असल्याने समस्या सोडवण्यात यश आले.

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध

मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईल / लॅपटॉपचा वापर करण्याची अनुमती होती. 85 वर्षावरील वयोवृद्ध, तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान प्रथमच गृहभेटी देवून टपाली मतपत्रिकेवर घेण्यात आले होते. त्यांचे व अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या एकूण 4939 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या. यासोबतच सेनादलात कर्तव्यावर असलेल्या मतदारांच्या 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली. या मतपत्रिकांचा निकाल सर्वात शेवटी जाहीर करण्यात आला.

मतमोजणीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जि.प.च्या सीईओ आयुषी सिंह यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज), आदित्य जीवने (अहेरी), कविता गायकवाड (आमगाव) व इतर संबंधित अधिकारी मतमोजणी केंद्रावर दिवसभर उपस्थित होते.