गडचिरोली : अतिसंरक्षित प्राणी म्हणून गणल्या जाणाऱ्या वाघांची शिकार करणाऱ्या हरियाणामधील टोळीची विदर्भातील वाघांवर वक्रदृष्टी पडली आहे. वनविभागाला त्याचा सुगावा लागल्याने या टोळीतील सदस्यांना गडचिरोली जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाघाच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. त्यांनी काही वाघांची शिकार केली असण्याची शक्यता असली तरी अनेक वाघांची शिकार करण्याचा डाव उधळल्या गेला.
एकीकडे चंद्रपूरसोबत गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात वाघ आणि त्यांच्याकडून होणाऱ्या मानवी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याचाच गैरफायदा शिकाऱ्यांच्या टोळीने घेत विदर्भात डेरा टाकला. दरम्यान गेल्या २८ जून २०२३ रोजी आसाम राज्यातील गुवाहाटी येथे पोलीस विभाग व वनविभागाच्या संयुक्त कारवाईत वाघाच्या शिकार प्रकरणी हरियाणा राज्यातील बावरीया जमातीच्या तीन व्यक्तींना वाघाची कातडी व हाडांसह अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त प्राथमिक माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली यांनी देशातील सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवतालच्या क्षेत्रांकरीता वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याची सूचना २९ जून रोजी दिली होती. त्यानुसार सदर शिकाऱ्यांनी चंद्रपूर व गडचिरोली या परिसरात शिकार केली का, याची पडताळणी करण्याकरीता आणि त्याबाबत अधिक गुप्त माहिती मिळवण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी तीन सदस्यीय पथक गुवाहाटी येथे पाठविले होते. सदर पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता सदर शिकारी टोळीमधील काही महत्त्वाचे सदस्य गडचिरोली वनविभागाच्या क्षेत्रात वावरत असल्याची माहिती समोर आली.
गुप्त माहितीच्या आधारे सदर सर्व संशयितांवर पोलीस विभागाच्या मदतीने गुप्त पाळत ठेवण्यात आली. त्यांना जेरबंद करण्याकरीता मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर वनवृत्त आणि गडचिरोली वनवृत्ताची एक संयुक्त चमू गठीत करण्यात आली. सदर चमूने २३ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता गडचिरोलीजवळच्या आंबेशिवणी येथे गडचिरोली पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्यात आंबेशिवणी येथे झोपड्यांमध्ये राहात असलेल्या हरियाणामधील ६ पुरूष, ५ महिला आणि ५ लहान मुले अशा सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्या झोपडीतून वाघांच्या शिकारीसाठी त्यांच्या पायांना जखडून ठेवण्यासाठी वापरले जाणारे ७ शिकंजे (ट्रॅप), धारदार शस्रे आणि ४६ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.
संशयितांकडून प्राप्त माहितीच्या आधारे करीमनगर (तेलंगाणा) व धुळे (महाराष्ट्र) येथून सुद्धा संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व संशयित हरियाणा व पंजाब या राज्यातील निवासी असल्याचे वनविभागाने कळविले.
ही सर्व कारवाई प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांच्या मार्गदर्शनात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प ज्योती बॅनर्जी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ.जितेंद्र रामगावकर, गडचिरोलीचे वनसंरक्षक रमेशकुमार, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, चंद्रपूरचे रविंद्रसिंह परदेशी, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा, ताडोबाचे सहायक वनसंरक्षक बापू येळे, गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक सोनल मडक यांच्यासह इतर वन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केली.
विशेष कार्यदलाचे गठण
या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व गडचिरोली वनवृत्तातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष कार्य दल गठीत करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती वरील सर्व संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे गचिरोली, चंद्रपूर तसेच तेलंगाणा राज्यात वाघांची शिकार करण्याचा परप्रांतीय टोळीचा मोठा कट अयशस्वी करण्यात वन विभाग व पोलीस विभागाला यश मिळाले आहे.