अहेरी : येथे कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. राजघराण्याचे वारसदार आणि माजी पालकमंत्री अब्रिशराव आत्राम यांनी पालखीत बसून नागरिकांना अभिवादन करत मिरवणुकीने गडअहेरीत जाऊन शमी वृक्षाचे पूजन केले. तसेच गडीमंदिरात पुजा केली. त्यानंतर त्यांनी रुक्मिणी महल समोरील पटांगणात नागरिकांना मार्गदर्शन केले.
अहेरी इस्टेटच्या दिडशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दसरा महोत्सवाला महाराष्ट्रासह लगतच्या तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यातील लोकांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना अम्ब्रिशराव म्हणाले, “दसरा” ही आपली ऐतिहासिक परंपरा अखंडपणे चालू आहे. पुढेही शेकडो वर्षे चालू राहील, असे सांगत त्यांनी या क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून लोकप्रतिनिधींना टोले लगावले.
दसऱ्याच्या दिवशी परंपरेप्रमाणे सकाळी अहेरीच्या मुख्य मार्गाने साईबाबा पालखी काढण्यात आली. संध्याकाळी पालखीत विराजमान होऊन राजे अम्ब्रिशराव यांनी सीमोल्लंघन करीत गडअहेरी येथे शमीच्या वृक्षाचे पूजन, तथा गडीमातेचे पूजन केले. यावेळी अहेरी राजपरिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.