सॅाफ्टबॅालच्या पुरुष गटात अमरावती तर महिला गटात कोल्हापूर अजिंक्य

गडचिरोलीत झाली राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा

गडचिरोली : येथील एमआयडीसी मैदानावर सुरू असलेल्या 29 व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पुरुष गटात अमरावती तर महिला गटात कोल्हापूर संघाने पटकावले. या अंतिम सामन्याला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुरुष व महिला विभागाच्या अंतिम सामन्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी नाणेफेक केली. त्यांनी या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजन समितीचे सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर व समस्त आयोजन समितीला कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे मागील पाच दिवसांपासून, म्हणजे 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धेसाठी राज्यभरातून 25 मुलांचे आणि 20 मुलींचे संघ गडचिरोलीत दाखल झाले होते. या संघांची निवास, भोजन व वाहतूक तथा मैदानाची व्यवस्था आयोजन समितीने चांगल्या प्रकारे ठेवली होती.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 23 ऑक्टोबरला पार पडला. या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.प्रशांत जाकी, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे महासचिव डॉ.प्रदीप तळवेकर, प्रा अष्टपुत्रे, प्रा. पैजनकर, भारतीय बॉल बॅडमिंटन महासंघाच्या सदस्य प्रा.रूपाली पापडकर, आयोजन समितीचे प्रमुख डॉ.सुरज येवतीकर, गोकुळ तांदळे, बिराज सर, आंतरराष्ट्रीय पंच किशोर चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यभरातील 45 संघांमध्ये यांनी मारली बाजी


या स्पर्धेत पुरुष विभागात प्रथम क्रमांक अमरावती, द्वितीय क्रमांक पुणे, तृतीय क्रमांक जळगाव, चतुर्थ क्रमांक नाशिक मनपा, तर महिला विभागात प्रथम क्रमांक कोल्हापूर, द्वितीय क्रमांक पुणे मनपा, तृतीय क्रमांक जळगाव मनपा, तर चतुर्थ क्रमांक पुणे यांनी प्राप्त केला. विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे संचालन आयोजन समितीचे सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे यांनी, तर आभार कपिल बागडे यांनी मानले.