पोर्ल्याजवळ रस्त्यात कोसळली मोठी झाडे, दोन तासांपेक्षा अधिक काळ वाहतूककोंडी

नागपूर महामार्गावर प्रवाशांना मनस्ताप

गडचिरोली : जोरदार वादळी वाऱ्यामुळे मंगळवारी (दि.22) संध्याकाळी गडचिरोली ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरच्या पोर्ला गावाजवळ मुख्य मार्गावर मोठी झाडे कोसळली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प पडून गडचिरोली ते आरमोरी मार्गावर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सुदैवाने कोसळलेली झाडे कोणत्या वाहनावर पडून जीवित हाणी झाली नाही. मात्र दोन ते अडीच तास वाहनधारक या कोंडीत अडकून पडले होते.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री गडचिरोलीकरांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. तत्पूर्वी जोरदार वादळ सुटल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. वादळाचा जोर एवढा तीव्र होता की पोर्ला बस थांब्याजवळील एक पानठेला लांबपर्यंत उडत जाऊन मुख्य मार्गावर जाऊन पडला. गडचिरोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोर्लाजवळ रस्त्यालगतच्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्या फांद्या हातांनी उचलून बाजुला करणे शक्य नसल्यामुळे दोन्ही बाजुने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान पोर्ला येथील नागरिकांनी मदतीसाठी धावून येत जाड दोरखंडाने बांधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या ओढून एका बाजुने करत रस्ता मोकळा केला. त्यानंतर हळुहळू ही वाहतूक कोंडी दूर झाली.

जेमतेम आठवडाभरापूर्वी अशाच पद्धतीने गडचिरोली-नागपूर मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात असलेल्या या मुख्य आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गावर रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी योग्य पद्धतीने तोडून संभाव्य अपघात टाळणे गरजेचे असते. परंतू राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका रहदारीला बसत आहे.