गडचिरोली : जिल्ह्यात रेशीमकोष, तेंदुपत्ता, लाख, मोहफुले यासारखे वनउपज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या कच्च्या वनउपजापासून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे आवश्यक सर्व साहित्य व प्रशिक्षण देण्यात येईल. येथील दुर्गम भागांना बारमाही रस्त्यांनी जोडून रस्ते, वीज, पाणी व शिक्षण या मूलभूत गरजा उपलब्ध करण्याकडे शासन प्राधान्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॅा.विजयकुमार गावित यांनी केले.
आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोलीतील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत गुरूवारी ना.डॅा.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत लाभार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आदिवासी खेळाडूंचा टक्का वाढावा म्हणून खेळासाठी समर्पित विशेष क्रीडा आश्रमशाळा सुरू करणार असल्याचीही माहिती डॉ.गावित यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिली.
या कार्यक्रमाला आ.डॉ.देवराव होळी, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र चौधरी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरड्डीवार, सुधाकर गौरकर तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, उत्तम इंगळे, नितीन मडावी, सदानंद गाथे, अक्षय उईके आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. यावेळी ना.गावित यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी डॉ.गावित यांनी प्रत्येक घरात विद्युत जोडणी व नळाचे पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी शासकिय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आदिवासी आश्रमशाळेत अधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगताना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॅा.गावित म्हणाले. स्पर्धा परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी पुणे, नाशिक आदी मोठ्या शहरात आठवीपासूनच्या किमान 500 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्याची सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याच्या लाभाचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. न्युक्लिअर बजेट योजनेंतर्गत काटेरी तार कुंपणासाठी ४० लाभार्थी, विविध व्यवसायाकरिता अर्थसहाय्य योजनेसाठी ३० लाभार्थी, शिवणयंत्र वाटप ५० लाभार्थीं यांना ८५ टक्के अनुदानाचा लाभ देण्यात आला. तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळांतर्गत १० लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुदान लाभाचे धनादेश वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन संतोष कन्नाके यांनी, तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, वासुदेव उसेंडी, दादाजी सोनकर, मुकेश गेडाम, सुधीर शेंडे, प्रकाश अक्यमवार, ओम राठोड, पुजा कोडापे, शुभांगी कोहळे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा व प्रकल्प कार्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.