अपघातानंतर एक तास केबिनमध्ये अडकून असलेल्या ट्रक चालकाला जीवदान

चामोर्शी पोलिसांचा पुढाकार, पहा व्हिडिओ

गडचिरोली : ‘जाको राखे साइयां, मार सके ना कोई’ असा वाक्प्रचार प्रचलित आहे. अर्थात ज्याच्यावर ईश्वराची कृपा असते, तो कोणत्याही संकटातून तरतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय गुरूवारी दुपारी एका ट्रक चालकाला आला. गडचिरोली ते चामोर्शी मार्गावर अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्याच्या खाली उतरून एका झाडावर धडकून उलटला. त्यामुळे चालक कॅबिनमध्ये फसला. चामोर्शी पोलिसांच्या पुढाकाराने क्रेन आणि दोन जेसीबींच्या सहाय्याने एक तास प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

शफीक शकिल खान (37 वर्ष) असे त्या ट्रकचालकाचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. सध्या तो गडचिरोलीत वास्तव्यास असतो. गुरूवारी (दि.22) दुपारी तो चामोर्शीतील व्यापाऱ्यांचा माल पोहोचवून देण्यासाठी गडचिरोलीमधून निघाला होता. कुरूड गावाजवळ शफीक याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. हा भरधाव ट्रक एका झाडावर आदळून उलटला. यामुळे कॅबिन पिचकल्या जाऊन चालक शफिकचा हात त्यात फसल्या गेला. प्रयत्न करूनही त्याला बाहेर पडणे शक्य होत नव्हते.

या अपघाताची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळताच पो.निरीक्षक विजयानंद पाटील यांच्यासह पो.उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, उपनिरीक्षक बसवराज हर्डीकर, हवालदार व्यंकटेश येलल्ला, संदीप क्षिरसागर आदींनी तिकडे धाव घेऊन चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ट्रकला मागे ओढून सरळ केल्याशिवाय चालकाला काढणे शक्य नव्हते. त्यामुळे एक क्रेन आणि दोन जेसीबी बोलवून उलटलेल्या ट्रकला सरळ करण्यात आले. एक तासाच्या प्रयत्नानंतर चालक शफीक याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चामोर्शी पोलिसांनी तातडीने हालचाली केल्यामुळे या चालकाला लवकर बाहेर काढणे शक्य झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

यानंतर त्याला उपचारासाठी चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या केवळ हाताला मोठी दुखापत झालेली असून इतर कुठे मार लागलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.