गडचिरोली : देवरी तालुका हा मागासलेला आणि दुर्गम तालुका आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजबांधव राहतात. तळागाळातील वंचितांच्या सोयीसाठी आणि आदिवासीची सांस्कृती टिकून राहावी यासाठी देवरीत एक कोटी रुपयांचे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृह मंजुर केले. या सभागृहांत विविध धार्मिक कार्यासोबत आदिवासींचे सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे होतील. यातून आदिवासी संस्कृतीचे जतन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि खा.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करत होते. आदिवासी बांधवांनी शिक्षणाकडे वळून शिक्षणाच्या प्रवाहात येऊन वैयक्तिक व सामाजिक विकास साधावा. आदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत, त्यांचा सुद्धा चांगला लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खा.नेते यांनी केले.
उद्घाटक ना.गावित यांनी आदिवासी समाजासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केल्याचे सांगत आदिवासींच्या विकास कामांना गती व चालना देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. हे सरकार आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित-शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरीच्या वतीने जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत या गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करण्यात आली. यावेळी मंचावर माजी आमदार संजय पुराम, भंडारा-गोंदिया लोकसभेचे समन्वयक विरेंद्र अंजनकर, आदिवासी महामंडळाचे अध्यक्ष भरतसिंग दुधनाग, जेष्ठ नेते झामसिंग येरणे, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, नगराध्यक्ष संजय उईके, न.प.उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, पं.स.सभापती अंबिका बंजार, उपसभापती अनिल बिसेन, जि.प.सदस्य कल्पना वालोदे, महेश जैन यांच्यासह आदिवासी नागरिक, बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.