मंत्री धर्मरावबाबांनी धरला ठेका, अन् ताईंनीही वाजविले झांज

दुर्गा विसर्जनाच्या उत्साहाचा पहा हा व्हिडीओ

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरल्याचे आपण अनेक वेळा पाहिले. पण दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत बाबांनी गाण्यावर ठेका धरत नृत्य करताना पाहून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. अहेरीतील राजवाडा निवासस्थानाच्या आवारातील दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक यावर्षी मोठ्या उत्साहात आणि झगमगाटात बुधवारी रात्री निघाली होती.

दरवर्षी अहेरीत दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहेरीत विसर्जन मिरवणुकीचा माहौल असतो. विसर्जन मिरवणुकीनिमित्त मोठ्या प्रमाणात रोषणाईसह विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राज परिवारातील सदस्यांसोबत अहेरीकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीत धर्मरावबाबा यांनी पारंपरिक आदिवासी नृत्य आणि डिजेवर ठेका धरला. एवढेच नाही तर लेझिम नृत्यातही ते सहभागी झाले होते.

विसर्जन मिरवणुकीतील उत्साह एवढा होता की युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पं. स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनीही ढोलताशाच्या गजरातील मिरवणुकीत ठेका धरला. याशिवाय हाती झांज घेऊन ते गाण्याच्या तालावर वाजवत उपस्थितांचा उत्साह वाढविला.